हेतू संपला की कारवाई थांबते, हेच सर्वात धोकादायक आहे – जयश्री खाडिलकर-पांडे

भाजपाने ईडी आणि इतर सरकारी यंत्रणांचे खेळणे बनविले आहे आणि आवश्‍यकतेनुसार या यंत्रणा कारवाई करतात असा आरोप होत आहे. आज भाजपाचे केंद्रातील सरकार या कारवाया करीत आहे आणि विरोधक या कारवायांमागे हेतू असल्याची बोंब मारत आहेत. दहा वर्षापूर्वी काँग्रेसची सत्ता होती तेव्हा त्यांनी भाजपाच्या डझनभर मंत्र्यांवर आरोप केले होते. भ्रष्टाचाराशी संबंधित ज्या कारवाया होतात त्यामागे हेतू असतो हे निश्‍चित आहे. पण हेतू आहे म्हणून या कारवाया चुकीच्या ठरत नाहीत. कारण तो भ्रष्टाचार उघड दिसत असतो. कागदोपत्री स्पष्ट होत असतो. त्यामुळे हेतू धरून कारवाई करणे हे वाईट असले तरी कारवाई होणे गरजेचेच आहे. कारवाईमागे हेतू आहे हे सामान्य माणसांच्या दृष्टीने महत्त्वाचे नाही. सामान्य माणसाच्या दृष्टीने ही गोष्ट महत्त्वाची आहे की, ‘हेतू’ संपताच कारवाई थांबते. म्हणजे भ्रष्टाचार झालेला असतो, कागदपत्र जप्त होतात, पत्रकार परिषदा आणि निवडणूक प्रचारात ती झळकवली जातात, चौकशी समिती नेमली जाते आणि अचानक एक दिवस सर्वच थांबते. काठावरची मगर पाण्यात दिसेनाशी होते. भ्रष्टाचार झाला असूनही तो गायब होतो.

जे काही घडते आहे त्यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे. राजकारण पूर्वीसारखे विचारांवर आणि तत्त्वांवर चाललेले नाही आणि राजकारणीही पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. प्रत्येकजण जनतेला वाऱ्यावर सोडून पैसा ओरबाडतो आहे. स्वतःच्या सात पिढ्यांची सोय करीत आहे. राजकारण्यांनी श्रीमंत होणे हे दुःख नाही, पण जनतेला लुटून श्रीमंत होणे हे पाप आहे. या पापापेक्षाही मोठे पाप म्हणजे आता स्वतः केलेला भ्रष्टाचार लपविण्याचे मार्गही त्यांच्या अंगवळणी पडले आहेत. जे धाडी आयोजित करणारे आहेत त्यांच्यातच सामील झाले की संरक्षण मिळते. पूर्वी गुंडाला हप्ता दिला की संरक्षण मिळायचे. आता गुंडाच्या गँगमध्येच दाखल व्हायचे म्हणजे आयुष्यभराचे संरक्षण आहे. हे संरक्षण मिळविण्यासाठी कंबरेचे सोडायलाही सर्व तयार आहेत.

अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर धाडी पडताच जो ‘हेतू’ दिसला तो शपथविधी होताना गायब झाला होता. विषय तेव्हाही होता आणि आजही विषय तोच आहे. अशी हजारो उदाहरणे आहेत. पनामा येतो, पँडोरा येतो त्यानंतर एकच घडते. गँगचे मेंबर वाढतात. गँगची मेंबरशीप घेतली की हेतू संपतो. गँग बदलली की हेतू डोकं वर काढतो. राजकारण्यांचा हा रोजचा खेळ आहे. म्हणून तर बीडीपासून ईडीपर्यंत काहीही मागे लागले तरी राजकारण्यांच्या चेहऱ्यावर सुरकुती पडत नाही आणि अंगावरचा कपडा चुरगळत नाही. राजकारणी कायम ताजेतवानेच दिसतात. सामान्य माणूस मात्र इतका नंबरी नसतो. बँकेचा हप्ता भरला नाही असा एक फोन आला तरी तो क्षणात दहा वर्षे वृद्ध होतो. आजची कारवाई झाली. पुढे काय होणार तेही माहीत आहे.

Share with :
Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on pinterest
Pinterest
Share on linkedin
LinkedIn
Close Bitnami banner
Bitnami