इस्लामाबाद- २६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि लष्कर-ए-तोयबाचा जहाल अतिरेकी साजिद मीर याला पाकिस्तानात अटक झाली आहे. एफबीआयने त्याला मोस्ट वॉन्टेड अतिरेकी म्हणून घोषित केले होते. परदेशी सरकारच्या संपत्तीचे नुकसान करण्याचा कट आखणे, अतिरेकी कारवायांना मदत करणे, परदेशी नागरिकांच्या हत्या आणि सार्वजनिक ठिकाणी बॉम्बस्फोट घडवणे असे आरोप अमेरिकेने त्याच्यावर ठेवले होते. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १६६ जण ठार झाले होते.
त्यात ६ अमेरिकी नागरिकांचा समावेश होता. साजिद मीरवर ५ अब्ज डॉलरचे इनाम अमेरिकेने जाहीर केले होते. आतापर्यंत तो पाकिस्तानात नसल्याचे आणि मरण पावला असल्याचे पाकिस्तान सरकार सांगत होते. मात्र आर्थिक संकटामुळे त्यांचे पितळ उघडे पडले आहे.
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड साजिद मीर पाकिस्तानात होता. मात्र त्यानंतरही पाकिस्तान सरकार सतत खोटे बोलत होते. तो पाकिस्तानात नाही. त्याचा मृत्यू झाला आहे, असे पाकिस्तानकडून वारंवार सांगितले जात होते. मात्र आता पाकिस्तान आर्थिक संकटात सापडला आहे. त्यासाठी त्यांना अन्य देशांच्या आर्थिक मदतीची गरज आहे. म्हणून पाकिस्तानने अतिरेक्यांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. त्यात त्यांनी साजिद मीरला अटक केली. त्याने मुंबई हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. २००१ पासून तो लष्कर-ए-तोयबाशी संबंधित आहे. २००६ ते २०११ पर्यंत त्याने अनेक दहशतवादी हल्ल्यांच्या योजना आखल्या होत्या. २००८ आणि २००९ मध्ये त्याने डॅनिश वृत्तपत्राच्या कार्यालयावर आणि कर्मचाऱ्यांवर अतिरेकी हल्ला चढवण्याची योजना आखली होती. २२ एप्रिल २०११ मध्ये एफबीआयने त्याच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले होते.