मुंबई – भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन मागे घेण्याबाबत दाखल करण्यात आलेल्या अर्जाची विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडून दखल घेण्यात आली. निलंबनाबाबत पुनर्विचार करण्यासाठी आज विधानभवनात बैठक पार पडली. पण, सुप्रीम कोर्टात सुनावणीच्या आदल्या दिवशी आम्हाला बोलावण्यात आले. त्यामुळे आम्ही आमची भूमिका थेट सुप्रीम कोर्टात मांडू, असे भाजपचे निलंबित आमदार आशिष शेलार यांनी सांगितले.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी भाजपच्या 12 आमदारांचे 1 वर्षासाठी निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर या आमदारांनी निलंबन मागे घेण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने निलंबन मागे घेण्यास नकार दिला होता. या आमदारांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर सुनावणी घेण्यास सहमती दर्शवून न्यायालयाने राज्य सरकार व विधिमंडळास बाजू मांडण्यास आपली भूमिका मांडण्यासाठी नोटीस बजावली होती. त्यानुसार आज दुपारी दोन वाजता विधानभवनात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या दालनात सुनावणी झाली. या सुनावणीनंतर बोलताना भाजपाचे नेते आशिष शेलार म्हणाले की, सर्व 12 आमदारांच्या वतीने आम्ही उपाध्यक्षांच्या दालनात सुनावणीला गेलो. सुपप्रीम कोर्टासमोर हे पप्रकरण आहे. उद्या किंवा परवा याबाबत सुनावणी होईल. आमची भूमिका सुप्रीम कोर्टात मांडली आहे. आम्ही कोणताही असा प्रकार केला नव्हता की आमचे एक वर्षासाठी निलंबन करावे. सुप्रीम कोर्ट आमचे ऐकते. निलंबनाची कारवाई हे सभागृहाच्या अधिकारात आहे. त्यावेळी आम्ही अर्ज केला होता. पण, अधिवेशन नसताना आम्हाला सुनावणीसाठी बोलावले. अधिवेशन सुरू असताना निर्णय झाला नाही. आम्ही सुपप्रीम कोर्टात आमची भूमिका मांडू.