नवी दिल्ली – नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात ईडीने काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना बजावलेल्या नोटिसीच्या विरोधात काँग्रेस जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. 13 जूनला राहुल गांधी यांना चौकशी आणि जबाब नोंदवण्यासाठी ईडीने कार्यालयात बोलावले आहे. त्यावेळी ते मोर्चाने कार्यालयात जाणार आहेत. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करणार आहेत. त्यासाठी सर्व प्रभारी, प्रदेशाध्यक्ष, खासदार आणि नेत्यांना 13 जूनला सकाळी 9.30 वाजता दिल्लीतील काँग्रेसच्या कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले आहेत. खासदार राहुल गांधी यांना नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीने समन्स बजावून 13 जूनला चौकशी आणि जबाबासाठी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. यावरून आक्रमक झालेल्या काँग्रेसने शक्तिप्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी काँग्रेसचे सरचिटणीस आणि संघटना प्रभारी के. सी. वेणुगोपाल यांनी गुरुवारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, राज्य प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे
बैठक घेतली.