कीव – रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे या दोन्ही देशांत विध्वंसाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्व शस्त्रानिशी रशिया युक्रेनवर हल्ले करत आहे तर युक्रेनही प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन्ही देशांकडून विरोधकांचे सैन्य ठार मारले असल्याचा दावा करण्यात येतोय. या दरम्यान, युक्रेनच्या मदतीला अनेक देश धावून आले आहे. अमेरिका, ब्रिटनसह २८ देशांनी युक्रेनला वैद्यकीय साहित्यासह लष्करी मदत देण्याचे मान्य केले आहे तर शस्त्रही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर, नेदरलँड यूक्रेनला 200 अँटी एअरक्राफ्ट मिसाईल देणार असल्याचा निर्णय झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, फ्रान्सही यूक्रेनला संरक्षण सामग्री देणार आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी शुक्रवारी अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याला युक्रेनला 350 दशलक्ष डॉलरची लष्करी मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. रशियाकडे मोठ्या प्रमाणात आधुनिक शस्त्रे आणि सैन्य आहे, त्यामुळे युक्रेनवर दबाव आहे. स्टेट सेक्रेटरी अँटनी ब्लिंकन यांना दिलेल्या निवेदनात राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी विदेशी सहाय्य कायद्याद्वारे वाटप केलेले 350 दशलक्ष डॉलर युक्रेनच्या संरक्षणासाठी देण्यात यावे असे निर्देश दिले आहेत.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या सैन्याने युक्रेनच्या आग्नेय झापोरिझ्झ्या भागातील मेलिटोपोल शहरावर ताबा मिळवला आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, मॉस्कोने आक्रमण सुरू केल्यानंतर हे शहर ताब्यात घेतलेले पहिले मोठे लोकसंख्या केंद्र आहे. मंत्रालयाने असेही सांगितले आहे की, रशियाने युक्रेनमधील लष्करी तळांवर रात्रभर हल्ले करण्यासाठी हवाई आणि जहाजावर आधारित क्रूझ क्षेपणास्त्रांचा वापर केला. रशियन सैन्याने लष्करी पायाभूत सुविधांच्या शेकडो लक्ष्यांना लक्ष्य केले आहे. अनेक विमाने आणि रणगाडे आणि तोफखाना, वाहने नष्ट झाली आहेत.