नोएडा – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली कावड यात्रा लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी नोएडा वाहतूक पोलिसांनी पूर्ण तयारी केली आहे. जिल्हा महानगर दंडाधिकारी सुहास एलवाई यांनी १४ ते २६ जुलै दरम्यान कावड यात्रा मार्गातील मटण आणि दारूची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. ही यात्रा सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टीने पोलिस तिच्या मार्गाची पाहणी करत आहेत.
कावड यात्रेच्या पार्श्वभूमीवर नोएडा पोलिसांनी बैठक आयोजित केली होती. बैठकीत त्यांनी यात्रा निर्वीघ्नपणे पार पडण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा केली. जिल्हा महानगर दंडाधिकारी सुहास एलवाई यांनी १४ ते २६ जुलै दरम्यान होणाऱ्या या कावड यात्रेच्या मार्गातील दारू आणि मटणाची दुकाने १३ दिवस बंद ठेवण्याचा आदेश दिला. ही यात्रा सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने पोलीस अधिकाऱ्यांनी कावड यात्रेचे मार्ग निश्चित करून त्यांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. तिच्या मार्गात ज्या ठिकाणी दारूची आणि मटणाची दुकाने आहेत ती बंद ठेवण्याच्या नोटीसा दुकान मालकांना दिल्या आहेत. त्यामुळे येथील ही दुकाने १३ दिवस बंद राहणार आहेत. कावड यात्रेच्यानिमित्ताने तेथे आरोग्य तज्ज्ञांचे पथक तैनात केले जाणार आहे.