मुंबई – कोरोना काळ ( Pandemic) हा प्रत्येकासाठी अतिशय कसोटीचा आहे. कोरोना संसर्गाच्या भितीपायी घरातच रहावे लागत असल्याने वयस्करांसह, लहान मुलांच्या मनावरही याचा परिणाम होऊ लागला आहे. कोरोनामुळे शाळा बंद आणि मित्रांना भेटता येत नसल्याने लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर फार वाईट प्रभाव पडत आहे. बरीच लहान मुलं आता नैराश्य, चिंता आणि तणाव यांसारख्या मानसिक त्रासातून जात आहेत. अशा स्थितीत आपल्या मुलांचे मानसिक आरोग्य जर चांगले राखायचे असेल तर त्याची महत्त्वाची जबाबदारी पालकांची आहे, असे तज्ज्ञ डॉक्टर सांगत आहेत.
वाचा – कोरोना होऊन गेल्यानंतर किती महिने अँटीबॉडीज शरीरात राहतात? महत्त्वाचं संशोधन आलं समोर
कोरोना आणखी काही महिने आपली पाठ सोडणार नाही. वर्षभराहून अधिक काळ राहिलेल्या या लॉकडाऊनमुळे प्रत्येकाचाच मानसिक ताण वाढत चालला आहे. रोजचं रूटीन गडबडल्या कारणाने लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. जर लॉकडाऊन अधिक काळ असाच सुरू राहिला तर लहान मुला-मुलींना अनेक मानसिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो, असे मानसोपचार तज्ज्ञ सांगत आहेत.
मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सोनल आनंद म्हणाल्या की, तुमची मुले चिंताग्रस्त आहेत का? कोविडशी संबंधित बातम्या पाहिल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर त्यांना वेडसर वाटते का? विषाणूची लागण होण्याच्या भितीमुळे वारंवार मुलं हात स्वच्छ करतात का? आपल्या मुलांना रात्री झोपेत कोरोनाची स्वप्ने पडतात का? मुलांच्या वागणुकीत काही बदल जाणवत आहेत का? असे असल्यास आपल्या मुलांना मानसिक आरोग्याचा त्रास होऊ शकतो. यासाठी आपल्या मुलांकडे वेळीच लक्ष द्या आणि तातडीने मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
वाचा – समजून घ्या! लस घेण्याआधी आणि घेतल्यानंतर काय काळजी घ्यावी
कोहिनूर रूग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. राहुल काबरा म्हणाले की, लॉकडाऊनचा विपरित परिणाम हा मोठ्यांसह लहान मुलांवरही होऊ लागला आहे. यामुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतोय. शाळा, मैदाने बंद असल्याने मुलांना दिवसभर घरातच बसून रहावे लागत असल्याने ती अक्षरशः कंटाळून गेली आहेत. कोरोना संसर्गामुळे पालक मुलांना खेळायला बाहेर पाठवत नसल्याने ही मुलं एकलकोंडी बनत चालली आहे. यामुळे मुलांमध्ये नैराश्य, चिंता व तणाव वाढतोय. मुलं हिसंक बनू लागली आहेत. त्यातच आजुबाजूला कोरोनाच्या चर्चा असल्याने मुलांच्या कोवळ्या मनात भिती दाटून येत आहे. अशावेळी मुलांच्या स्वभावातील हे बदल पालकांनी ओळखणं गरजेचं आहे. जेणेकरून वेळीच ही गोष्ट कळल्यास मुलांना मानसिक आजारातून पटकन बाहेर काढता येऊ शकते.
वाचा – जाणून घ्या! उन्हाळ्यात कोरड्या पडणाऱ्या डोळ्यांची काळजी कशी घ्याल?
पालकांनो, मुलाच्या मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्याल…
- आपल्या मुलांना कोरोना विषाणूची पुरेशी माहिती करून द्या. मुलांनी दिवसभर टिव्हीवर काय पहावेत हे ठरवा. सोशल मीडियाचा मुलांना अतिरिक्त वापर करू देऊ नका. मुलांना घरच्या घरी शैक्षणिक चित्रपट दाखवा. जेणेकरून त्यांचे मनोरंजन होईल.
- मुलांबरोबर घरी वेळ घालवण्यासाठी बुद्धिबळ, कॅरम यांसारखे बैठी खेळ खेळा. पुस्तक वाचणे, व्यायाम करणे आणि संगीत ऐकूनही तुम्ही मुलांसोबत राहु शकता. असे केल्याने आपल्या मुलांना आनंद होईल.
- मुलांना चांगल्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करा.
- आपल्या मुलाला घरी कंटाळा येऊ नये, यासाठी त्यांना कुठल्या ना कुठल्या कामात सतत व्यस्त ठेवा.
- आपली मुलं घरी कोविड-१९ प्रोटोकॉलचे पालन करत आहेत ना, याची खात्री करून घ्या. चेहऱ्यावर मास्क लावणे, सामाजिक अंतर पाळणे आणि हात स्वच्छ धुवणे, याचे महत्त्व मुलांना पटवून द्या.
वाचा – कोरोना संसर्गापासून स्वतःचं कसं रक्षण कराल? तज्ज्ञांनी दिला सल्ला