अयोध्या – अयोध्येत महाराष्ट्र सदनासाठी जागा मागणार, अशी घोषणा आज राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. अयोध्येत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार संजय राऊत उपस्थित होते.
आदित्य ठाकरे म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांनी मला सांगितले की, मी स्वतः योगी आदित्यनाथ यांच्यासोबत बोलणार आहे. ते फोनवर बोलतील आणि पत्रदेखील पाठवतील. अयोध्येत ते महाराष्ट्र सदनासाठी जागा मागणार आहेत. साधारणपणे १०० खोल्यांचे सदन या ठिकाणी आपण करणार आहोत.’ तसेच आपण इथे दर्शन घ्यायला आलो असून ही राजकीय यात्रा नाही, असे आदित्य यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी जय्यत तयारी केली आहे. लखनौ विमानतळापासून अयोध्येकडे जाणारे मुख्यमार्ग आणि ठिकठिकाणी आदित्य ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर लावलेले आहे. तसेच अनेक ठिकाणी भगवे ध्वज आणि कमानीही लावण्यात आल्या आहेत. रामलल्लाची आरती, पत्रकार परिषद, इस्कॉन मंदिराला भेट असा हा भरगच्च कार्यक्रम असणार आहे. आता पत्रकार परिषद घेतल्यानंतर आदित्य ठाकरे रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी शरयू नदीच्या घाटावर आरतीही करणार आहे. मग आदित्य ठाकरे हे पुन्हा लखनऊ विमानतळावरून परतीच्या प्रवासाला निघतील.