भोपाळ – मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यातील खलघाट येथे प्रवाशांनी भरलेली बस नर्मदा नदीत कोसळून 13 जणांचा मृत्यू झाला आहे. सकाळी 10 वाजण्याचा सुमारास हा अपघात झाल्याचे कळते. अपघातग्रस्त बस ही महाराष्ट्र राज्य परिवहनची असून तिच्यातील 10 ते 12 प्रवासी बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बसमधील तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या बसचे चालक चंद्रकांत एकनाथ पाटील आणि वाहक प्रकाश श्रावण चौधरी हे बस घेऊन सकाळी साडेसातच्या सुमारास इंदोरहून अमळनेरकडे निघाले होते. त्यावेळी बसमध्ये अचानक काही तांत्रिक बिघाड झाला आणि ती थेट खलघाट संजय सेतू पुलावरून 25 फूट नर्मदा नदीत कोसळली. यात बसमधील 13 जणांचा मृत्यू झाला असून 15 जणांना वाचवण्यात यश आल्याचे शिवराज सरकारमधील कॅबिनेट मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले.