नवी दिल्ली – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पाच टी२० सामन्यांची मालिका ९ जूनपासून सुरू होत आहे. मालिकेचा पहिला सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळविण्यात येईल. कोरोनाचे निर्बंध हटवल्यानंतर यावेळी स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीस परवानगी मिळाल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे. ३५ हजार आसन क्षमता असलेल्या या स्टेडियममध्ये पहिल्या सामन्यासाठी जवळपास ९४ टक्के तिकिटे बुक झाली आहेत. तर, आता केवळ ४०० ते ५०० तिकिटेच उरली आहे.
दिल्ली डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनने (DDCA) जवळपास २७ हजार तिकीटे विक्रीसाठी ठेवली होती. तसेच चाहत्यांचा एक चांगला अनुभव देण्यासाठी वरिष्ठ नागरिकांसाठी गोल्फ कारमधून स्टेडियममध्ये दाखल होण्याचा पर्यायदेखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. दरम्यान, देशभरातील कोरोनाची स्थिती सध्या नियंत्रणात असली तरी डीडीसीएने प्रेक्षकांना मास्क घालून येण्याची विनंती केली आहे.